कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोणाचा पराभव होणार आणि कोण कोणाला धक्का देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. 


ठाकरे गट किंवा पवार गटातील कोणाचा तरी पराभव होणार


या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी बोलताना थेट विजयाचा दावा करतानाच कोण पराभूत होणार हे सुद्धा सांगितलं. ठाकरे गट किंवा पवार गटातील कोणाचा तरी पराभव होणार आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला. जयंत पाटील यांच्या बाबतीत शरद पवार यांचे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेलं दिसत नाही, असा खोचक टोलाही लगावला. 


इलेक्टिव्ह मेरिटनुसार जागा दिल्या जातील 


दरम्यान, जनसुराशक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 12 ते 15 जागांची मागणी करतानाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान चार जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विनय कोरे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट केली. कोरे यांनी केलेल्या जागा वाटपाच्या मागणीवर त्यांनी सांगितले की विनय कोरे यांना जागा सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार केला जाईल. इलेक्टिव्ह मेरिटवर जागा दिल्या जातील. निवडून येण्याची क्षमता दाखवतील आणि नेते मंडळींना पटलं तर ते जागा देतील अशी भूमिका त्यांनी मांडली. 


यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर सुद्धा भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा कळीचा झाला आहे. मुश्रीफ म्हणाले की विशाळगडावरील संबंधित जागा पुरातत्व विभागाच्या मालकीच्या आहेत. स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने संघटनांचे प्रतिनिधी मला भेटल्यास त्यांची समजूत काढू असेही ते म्हणाले. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने अधिकाऱ्यांना सुद्धा अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले.


कोणाला हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं


दरम्यान, शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना क्लीन चिट देण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सांगितले की, कोणी काय केलं नसेल, तर क्लीन चिट मिळणारच आहे किंवा कोणाला हरकत असेल तर त्यांनी न्यायालयात जावं. दरम्यान,  विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळावर तयारी करत असल्याचे भाष्य सुद्धा हसन मुश्रीफ यांनी केले. 
 


 इतर महत्वाच्या बातम्या