प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात हुंडा प्रतिबंधक अधिकारी नियुक्त!
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2017 05:51 PM (IST)
नांदेड : एबीपी माझाच्या हुंडाविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने हुंडा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तालुका स्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), जिल्हा स्तरावर महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकारी आणि राज्य स्तरावर महिला आणि बालविकास आयुक्त, पुणे यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. महिला आणि बालविकास आयुक्त यांची महाराष्ट्र राज्य क्षेत्रासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय क्षेत्रासाठी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांची संबंधित तालुका क्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एबीपी माझाने हुंडा प्रथेविरोधात औरंगाबादमध्ये हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर जळगावमध्ये एबीपी माझाची हुंडाविरोधी परिषद झाली. मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसात मराठवाड्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. एवढंच नाही, तर वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्यामुळे हुंड्याच्या या क्रूरप्रथेला मूठमाथी मिळावी म्हणून ‘एबीपी माझा’नं एक पाऊल पुढं टाकलं आहे. थेट फोन लावून तक्रार करा! महिला आणि बालविकास विभागाने हुंड्याविरोधात आवाज उठवण्यासाठी थेट फोन लावून तक्रार करण्याचंही आवाहन केलं आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय, नांदेड यांना 02462-261242 किंवा 267800 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. संबंधित बातम्या