नांदेड : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे अनेक भागात पुन्हा एकदा अचानक भारनियमन सुरू झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची सर्वत्र मागणी वाढली आहे. विजेचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी नांदेड परिमंडळात वीज चोरांवर धडक कारवाई सुरु केली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करून घेण्यासाठी कूलर, पंखे, एसी अशा पर्यायांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय, अशा उष्णतेत थंड पाण्याचे प्लांट, रसवंती, आईस्क्रीम पार्लर, आईस कँडी कारखाने विविध ठिकाणी थाटले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे रोजची विजेची मागणी प्रचंड वाढली आहे.

जेवढी विजेची मागणी आहे, तेवढा वीज पुरवठा मात्र होत नाही. परिणामी राज्यात अनेक भागात भारनियमन सुरू झाले आहे. उन्हाळी हंगामात सुरू झालेले उद्योग हे अनेकदा वीज चोरी करून सुरू राहतात. त्यामुळे नांदेड महावितरण विभागाने अशा सर्व उन्हाळी उद्योगांची आणि घरगुती वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे.

या तपासणी दरम्यान या पथकाला नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात एका वॉटर प्लांटच्या मीटर तपासणीत रिमोटद्वारे मीटरमध्ये फेरबदल केल्याचे आढळून आले. महावितरणने या वॉटर प्लांट मालकांविरोधात वीज चोरीचा गुन्हा नोंदवून सुमारे 54 हजार रूपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे ज्या भागात विजेची चोरी सुरू आहे त्या भागातील लोकांनी महावितरणला याबाबत गोपनीय माहिती देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. नियमित वीज बिल भरूनही अनेकांना भारनियमनचा नाहक त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच महावितरणने वीज टंचाईच्या काळात वीज चोरांविरुद्ध मोहीम उघडल्याने त्याचा फायदा प्रामाणिक ग्राहकांना होणार आहे. ही मोहीम केवळ नांदेड विभागात न राबवता संपूर्ण राज्यात काटेकोरपणे राबवली गेल्यास विजेचा तुटवडा कमी होऊन भारनियमनातून मुक्तता मिळेल अशी आशा आहे.