सोलापूर : हजार पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्याने अनेकांनी अडचण होत असल्याची तक्रार केली आहे. एकीकडे काळा पैसा असलेल्यांचे धाबे दणाणले असतानाच सोलापुरातल्या एका लाचखोर अधिकाऱ्याची भूक काही भागलेली नाही. मात्र लाच देताना शंभरच्याच नोटा देण्याची तंबी त्याने दिल्याची माहिती आहे.
सोलापुरात मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडलं. जिल्हा परिषदेकडे कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पाठवण्यासाठी अडीच हजाराची लाच मागितल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे लाच घेण्यापूर्वी अधिकाऱ्याने फक्त शंभरच्याच नोटा आणण्याची तंबी त्याने दिली होती.
बाळासाहेब भिकाजी बाबर असं लाच घेताना रंगेहाथ सापडलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. हिंगणीतील दत्तात्रय बेडगे यांच्या मलीकबाबा कृषिसेवा केंद्राच्या परवान्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी बाबरने लाच मागितल्याचा आरोप आहे.
बेडगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तयाप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने बाबरने लाच घेण्यासाठी फक्त शंभर रुपयांच्याच नोटा आणण्याची ताकीद बेडगे यांना दिली होती. बाबर याने शंभर रुपयांच्या पंचवीस नोटा लाच म्हणून स्वीकारल्या.