बीड : खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या संजय कुऱ्हाडे या व्यक्तीविरोधात बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, सिरसाळा या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रारी दाखल केल्या.


परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुणे येथील संजय कुऱ्हाडे नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कुऱ्हाडे या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या  कलम  509, 502 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बीड जिल्ह्यातील बीड, परळी, केज, धारुर, आष्टी, पाटोदा, शिरुर, वडवणी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंडे समर्थकांनी विविध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली.

महिला आयोगाकडूनही दखल

महिला लोकप्रतिनिधीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. आठ दिवसात संजय कुऱ्हाडे याला व्यक्तीश: उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. फेसबुक या समाज माध्यमावर महिला लोकप्रतिनिधीबाबत कुऱ्हाडेने केलेलं वक्तव्य महिला लोकप्रतिनिधींचा अवमान आणि स्त्रीची प्रतिमा मलिन करणारं असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदमांच्या वक्तव्यावरून संजय कुऱ्हाडे यांनी 'प्रीतम मुंडे' देखील अविवाहित असल्याची टिप्पणी सोशल मीडियावर केली होती. याच रागातून काल निगडीत गणेश कराड आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक लाईव्ह करून संजय कुऱ्हाडेंना मारहाण आणि शिवीगाळ केली होती.

संजय कुऱ्हाडे हे कॅम्प एज्युकेशनमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गणेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कुऱ्हाडेंना निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतलं. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाणही केली.

संबंधित बातमी :
खा. प्रीतम मुंडेंवर आक्षेपार्ह टिप्पणी, फेसबुक लाईव्ह करुन शिक्षकाला मारहाण