एकनाथ खडसे भाजपच्या होर्डिंग्सवरुनही गायब!
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 02:38 AM (IST)
नाशिक : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा देऊन आठवडा उलटला नाही, तोच भाजपाच्या होर्डिंग्सवरुनही खडसे गायब झाल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या वसंत स्मृती या भाजपाच्या कार्यालयात अनुसूचित जमात मोर्चा विस्तार व पदग्रहण समारंभ सोहळ्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आले होते, त्यानिमित्त भाजपाच्या कार्यालयाबाहेर अनेक होर्डिंग्स लावण्यात आले होते. त्यावर फडणवीस, गडकरी, दानवे यांच्यापासून स्थानिक सर्व नेते मंडळींचे फोटो लावण्यात आले होते. मात्र, होर्डिंग्सवरील नेत्यांच्या फोटोंच्या रांगेत खडसे गायब होते. याबद्दल सावरांशी विचारणा केली असता, चूक झाली असेल तर दुरुस्ती करू, असे त्यांनी सांगितले. “एकनाथ खडसे हे राज्यातील मोठे नेते आहेत. ते 40 वर्षे राजकारणात आहेत. त्यांच्याबद्दल आकस नसून प्रोटोकॉलनुसार त्या त्या वेळी वागावं लागतं”, असेही त्यांनी सांगितलं.