मालवाहतुकीची कार्यप्रणाली ठरविण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयात एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या महामंडळाच्या विभागीय कार्यालयात समन्वय अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) ची नेमणूक करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे समाजातील सर्व घटकांना म्हणजेच शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या मालवाहतुकीच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.
नॉन रेड झोनमध्ये आजपासून एसटीची जिल्हांतर्गत सेवा सुरु, कसं आहे बसचं नियोजन?
कोकणच्या हापूस आंब्या पासून मालवाहतूकीस प्रारंभ
एसटीने मालवाहतूकीचा प्रारंभ कोकणच्या हापूस आंब्याच्या वाहतूकीने केला असून 150 आंब्यांच्या पेट्या घेऊन एसटीचा एक ट्रक रत्नागिरी कडून बोरिवलीकडे रवाना झाला आहे. कोकणचा हापूस मुंबई-पुण्याच्या ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे.
एसटीच्या विस्ताराचा मालवाहतूकीला भक्कम आधार
गेली ७२ वर्ष अविरत प्रवासी दळणवळण सेवा देणारं एसटी महामंडळ देशातील एक अग्रगण्य सार्वजनिक दळणवळण उपक्रम असून त्यांच्या सेवेचं जाळं 250 आगार, 601 बसस्थानकामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेलं आहे. महामंडळाकडे सुमारे 18 हजार 500 बसेस असून त्यामध्ये सुमारे 300 ट्रक चा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी, महामंडळाने प्रवासी वाहतूकीसाठी असलेल्या सुविधांचा लाभ मालवाहतूक करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीचे मालवाहतुक वाहन तयार होणार
सुरुवातीला महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या ट्रक मधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. त्यामधून साधारण नऊ मेट्रिक टन पर्यंत वजनाच्या मालाची वाहतूक थेट पद्धतीने किंवा टप्पा पद्धतीने केली जाणार आहे. महामंडळातर्फे विहित आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी वाहनांमध्ये अंतर्गत बदल करून 9 मेट्रिक टन वजनाचा पर्यंतच्या मालाची वाहतूक केली जाणार आहे.
मालवाहतुकीच्या बुकिंगची व्यवस्था
मालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुकिंगची व्यवस्था, महामंडळाच्या प्रत्येक आगारात , बस स्थानकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची कार्यप्रणाली लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
माफक दरात मालवाहतूक
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या तसेच इतर मालाच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे , त्यामुळेच राज्य परिवहन महामंडळाने अतिशय माफक दरामध्ये मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे.