अहमदनगर: “न्यायमूर्ती बी.एच.लोया यांना नियोजनपूर्वक मारलं आहे. इतकंच नाही तर लोया यांना न्यायनिवाड्यासाठी शंभर कोटींची ऑफर होती. त्याची माहिती मला देणाऱ्या लोयांच्या दोन जिल्हा न्यायाधीश मित्रांचीही अशीच हत्या झाली आहे, ", असा गौप्यस्फोट माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला. ते अहमदनगरमधील शब्दगंध साहित्य संमेलनात बोलत होते.


यावेळी कोळसे पाटील यांनी सरकार, न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी चौफेर टीका केली.

मी साक्षीदार

लोया यांना शंभर कोटींची ऑफर होती. त्यांच्यावर न्यायनिवाड्यासाठी दबाव होता. निकालपत्राचा ड्राफ्ट तयार होता. हाच निकाल दिल्यास, शंभर कोटी मिळतील, अशी ऑफर लोयांना होती. त्याबाबत त्यांचे जिल्हा न्यायाधीश आसलेले दोन मित्र माझ्याकडे आले होते. दोघांनीही त्यांच्यावर दबाव असल्याचं सांगितलं होतं. या संदर्भात आपण त्यांना प्रशांत भूषण यांच्याकडे पाठवलं होतं, असं  माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील म्हणाले.

दोन न्यायाधीशांचीही हत्या, माझाही नंबर

न्यायमूर्ती लोया यांना नियोजनपूर्वक मारलं असून, माझ्याकडे आलेल्या दोन जिल्हा न्यायाधीशांचीही हत्या झाल्याचा आरोप   माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केला.

एका न्यायाधीशाला इमारतीवरुन फेकून दिलं तर एकाला रेल्वेतून फेकून दिल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर मृतदेहांचं शवविच्छेदन केलं नाही, तर एकाकडून सुसाईड नोट लिहून घेतल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काही न्यायाधीश अजूनही भितीत आहेत. माझाही चौथा नंबर असून हे माझं शेवटचं भाषण असू शकतं, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

सरकार-न्यायालयाचं साटंलोटं

न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे हे खोटं असून, तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यानं तुम्हाला काही दिसत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालय आणि सरकारचं साटंलोटं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

लोया यांची  हत्या ही न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. त्यामुळं या प्रकरणाची प्रामाणिकपणे स्वतंत्रपणे चौकशी करुन न्याय द्यावा, अशी मागणी  माजी न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी केली.

याचिकाकर्ता हा पूर्वीचा अमित शहा यांचा वकील होता. मात्र नागपूर आणि मुंबईला याचिका प्रलंबित असताना, सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी स्वत:कडे घेतली. त्याचबरोबर लोयांच्या शवविच्छेदन अहवालात गडबड असून त्यांचा मुक्काम आणि काढून घेतलेल्या सुरक्षेवर शंका उपस्थित केली.

आता शंभर कोटी घेऊन न्यायाधीश निकाल देणार असल्याचा गंभीर आरोप  त्यांनी केलाय.  सध्या भितीचं वातावरण असल्याचं  माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी म्हटलंय

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण काय आहे?

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात सुनावणी करणारे विशेष सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू झाला होता. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात अमित शाहा आरोपी होते.

नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेले.

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण

गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं.

संबंधित बातम्या

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?  

वडिलांच्या मृत्यूबाबत आमचा कुणावरही संशय नाही : अनुज लोया 

जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस

या एका केसमुळे न्यायमूर्तींच्या असंतोषाचा कडेलोट झाला 


सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?