अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2018 11:09 PM (IST)
धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं.
मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं. धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले. धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील. जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचं आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.