गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2017 08:50 PM (IST)
अकोला: गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांच्यावर मारहाणप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझानं याप्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यानंतर तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 323 आणि 540 या दोन कलमांअर्तंगत मूर्तिजापूर पोलिसांनी विठ्ठल पाटलांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यानंतर तक्रारदार संजय आठवले यांनी फोनवरुन एबीपी माझाकडे आपली भूमिका स्पष्ट केली. ‘विठ्ठल पाटील यांनी मला शिवीगाळ करत मारहाण केली. पण तरीही त्या पद्धतीनं तपास न होता त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मी नाराज आहे. यासाठीही पोलिसांनी पाच दिवस घेतले. पण एबीपी माझाच्या पाठपुराव्यामुळे किमान हा गुन्हा तरी दाखल झाला. त्यामुळे मी एबीपी माझाचे मनापासून आभार मानतो. मला आशा आहे की, मला नक्कीच न्याय मिळेल.’ असं संजय आठवले म्हणाले. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील काय म्हणाले होते? पोलीस तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार आपल्या वडिलांवर कारवाई केली जाईल, यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. दरवर्षी अॅडमिशनच्या वेळी हे वाद होतात, वडील तो कारभार पाहतात, त्याच्याशी माझा संबंध नाही. असं रणजीत पाटील यांनी सांगितलं होतं. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आपल्या आणि संजय देशमुखांच्या संस्थेत वाद असल्याचं रणजीत पाटलांनी मान्य केलं. दरम्यान, पोलीस तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि कायदा त्याचं काम करेल, असं रणजित पाटील म्हणाले होते. मुर्तिजापूर तालूक्यातील घुंगशी हे रणजीत पाटील यांचं मूळ गाव आहे. वडील घुंगशी येथेच शेती करत असल्याची माहिती त्यांनी दिली.