मुंबई: दूषित बर्फावर उपाय म्हणून प्रशासनाने खाण्यासाठी अयोग्य असलेल्या बर्फाचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच अखाद्य बर्फाला निळा रंग देण्यात येणार आहे.


अखाद्य बर्फ थंड पेयात वापरला जाऊ नये, किंवा तो वापरला असल्यास तातडीने लक्षात यावं, हा त्यामागचा हेतू आहे. एक जूनपासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबत विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निवेदन सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्रानेही मंजुरी दिली असून देशात सर्वच राज्यांना लागू केला आहे.

रस्त्यावर फेरीवाल्यांकडे असलेल्या थंड पेयांमधील बर्फाचे नमुने दूषित आढळल्यानंतर, अन्न आणि औषध प्रशासनान कडक पावलं उचलली होती. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई शहर आणि उपनगरात गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पाहणी करुन, रस्त्यावरील बर्फाचे 74 टक्के नमुने दूषित असल्याचं उघड केलं होतं. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने अशा बर्फाला प्रतिबंध म्हणून त्याचा रंगच बदलण्याचा निर्णय घेतला.

स्पेशल रिपोर्ट : मुंबईतील फेरीवाल्यांकडे ई कोलाय विषाणूयुक्त दूषित बर्फ


सध्या फेरीवाले किंवा रस्त्यावरील थंड पेय विक्रेते कमी किमतीतील बर्फ घेऊन, तो थंड पेयामध्ये वापरतात. मात्र हा बर्फ दूषित असल्याने, त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. गॅस्ट्रो, जुलाब यासह अनेक आजारांना सामोरं जावं लागतं.

खाण्यायोग्य बर्फ हा पिण्याच्या पाण्याद्वारे बनवला जातो. तर मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होणारा बर्फ हा कोणत्या पाण्यातून बनवला जातो, हे आपण कोणीही सांगू शकत नाही.

शिवाय मोठ्या कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या बर्फाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. जसा मृतदेह टिकवण्यासाठी, औषधांच्या संवर्धनासाठी वगैरे उपयोग होतो. मात्र हाच बर्फ कमी किमतीत मिळत असल्याने फेरीवाले तो थंडपेयात वापरत असल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या
सरकारची आयडिया, खाण्यास अयोग्य बर्फाचा रंग बदलणार!

रस्त्यावरच्या ज्यूस-गोळ्यातलं 74 टक्के पाणी दुषित : BMC

स्पेशल रिपोर्ट : मुंबईतील फेरीवाल्यांकडे ई कोलाय विषाणूयुक्त दूषित बर्फ