नवी दिल्ली/नागपूर : दूध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली आणि नागपुरात बैठका झाल्या. मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाच्या दालनात बैठक पार पडली. मात्र या बैठकीत दूध दरावर कुठलाही तोडगा निघाला नाही. यावर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.


नितीन गडकरींच्या मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीसाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

नागपुरात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीयांची बैठक झाली. या बैठकीतही कोणताही निर्णय झाला नाही. सरकार एक लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन करणाऱ्या दूध संघांसोबत गुरुवारी बैठक घेऊन तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. तोपर्यंत दूध प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

नागपुरात झालेल्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, संजय दत्त, विनायक मेटे उपस्थित होते.