नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर चौफेर फटकेबाजी केली. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बुलेट ट्रेन या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरून सरकारला त्यांनी धारेवर धरलं.
''बुलेट ट्रेन मुंबई ते गुजरातच का?''
बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट आहे. लाखो-कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी आपल्याला चुकवावे लागणार आहे. बरं बुलेट ट्रेन मुंबई ते गुजरातच का? मुंबई ते दिल्ली का नाही? असा सवालही भुजबळांनी केला.
सरकारने काय करायचं ते करा, पण जे गरजेचे आहे आधी ते करा. मुंबईची परिस्थिती काय आहे? ब्रीज पडत आहेत, विमान पडत आहे, रस्ते खचत आहे. मानसाने कुठे-कुठे लक्ष घालावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांना जगणे मुश्कील झाले आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
''मेक इन महाराष्ट्रचं काय झालं?''
सरकारने योजना केल्या. त्यांचा गाजावाजा केला मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र यातून काहीच साध्य झालं नाही. तरुणांना हवा त्याप्रमाणात रोजगार मिळाला नाही. राज्यातून सोन्याचा धूर निघेल असं स्वप्न दाखवलं गेलं. मेक इन महाराष्ट्राचा सांगता समारंभ पार पडला, पण त्या स्टेजला आग लागली. त्या योजनेची खरोखरच सांगता झाली. हे अवास्तव स्वप्न आहे, असं म्हणत भुजबळांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.
दरम्यान, सरकारने नोटाबंदी केली, त्यामुळे लोकांचे धंदे बुडाले, असं म्हणत भुजबळांनी केंद्रातील भाजप सरकारवरही निशाणा साधला.
''मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं''
कायदा-सुव्यवस्थेबाबत न बोललेलं बरं. नागपूर आहे की पिस्तूलपूर आहे अशा प्रकारे मथळे वर्तमानपत्र छापले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी ग्रुहमंत्रीपदाचा कारभार सोडावा या मताचा मी नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यात हस्तक्षेप करून हे थांबवावे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, असंही भुजबळ म्हणाले.
''मनुवादाला इथे थारा नाही''
आज दलितांवर हल्ले होत आहे. पुन्हा एकदा राज्यात मनुवाद बोकाळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे राज्य फुले, शाहु, आंबेडकरांचे राज्य आहे. मनुवादाला इथे थारा नाही, असं भुजबळ म्हणाले.
फुलेंनी सांगितले होतं मनुस्मृती जाळा आणि बाबासाहेबांनी ती जाळली. नंतर सुंदर असं संविधान निर्माण केलं, त्यामुळेच आपला देश एकसंध राहिला. पण आज काही लोक मनु श्रेष्ठ आहे असे बोलत आहेत. सरकारने सांगावं अशा लोकांना आळा घालणार आहे की नाही? ही प्रवृत्ती नष्ट कशी होईल याचा प्रयत्न सरकारने करायला हवा, नाही तर संतांनी, महापुरुषांनी जे करून ठेवले आहे ते नष्ट होईल, अशी चिंताही भुजबळांनी व्यक्त केली.
''एमपीएससी परीक्षेत महिलांवर अन्याय''
एमपीएससी परीक्षेत महिलांना समांतर आरक्षण नव्हतं म्हणून महिलांनी खुल्या वर्गातून परीक्षा दिल्या. त्या महिला पास झाल्या. नोकरीवर रुजू होताना त्यांना विचारणा केली गेली की तुम्ही खुल्या वर्गातून का परीक्षा दिली. ज्यांच्याकडे पैसे होते अशा महिलांनी कोर्टात लढा दिला आणि त्यांना न्याय मिळाला पण ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांना न्याय मिळाला नाही. सर्वांना एकच न्याय असायला हवा, अशी मागणी भुजबळांनी केली.
''राज्यातील कारागृहांची अवस्था बिकट''
राज्यातील कारागृहांची अवस्था बिकट आहे. हजार माणसांच्या जागी 3.5 हजार माणसांना ठेवलं जात आहे. कारागृहात जनावरासारखी वागणूक दिली जाते. लोकांना जामीन मिळत नाही. खरे आरोपी मिळत नाहीत, गरीबांना तुरुंगात डांबलं जात आहे, असं म्हणत भुजबळांनी तुरुंगातील परिस्थितीवरही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
नाशिक जिल्हा मादक पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. या लोकांवर सरकार कारवाई करत नाही मात्र गरीब, आदिवासी लोकांनाच पकडलं जात आहे. सरकारने कडक पाऊले उचलली तर याला आळा बसू शकतो, असं भुजबळ म्हणाले.