जयंत आठवलेंना अलिकडच्या काळात कुणी जाहीरपणे पाहिल्याची माहिती नाही. किमान माध्यमं, वृत्तपत्रात तरी तसं दिसलं नाही. आता सनातनचं नाव यात समोर आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची तयारी तपास यंत्रणांनी केलीय.
कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करताना समाजातील विवेकी आवाज दाबण्याचा कट सुरु असल्याचा आरोप सनातनवर झाला. त्यामुळेच सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागलीय. टोकाचं हिंदुत्व आणि परंपरावाद हा सनातनचा पाया आहे.
कोण आहेत जयंत आठवले?
1943 मध्ये सनातनचे प्रमुख जयंत बाळाजी आठवलेंचा जन्म झाला. आठवलेंचं मूळ कुटुंब रायगड जिल्ह्यातल्या नागाठणे गावचं आहे. जयंत आठवलेंनी क्लिनिकल हिप्नोथेरपीचा अभ्यास केला, आणि बरीच वर्ष ते लंडनमध्ये होते. सत्तरीच्या दशकात जयंत आठवले मुंबईत आले, आणि त्यांनी इथं प्रॅक्टिस करतानाच हिप्नोथेरपीवर संशोधनही केलं.
सनातनच्या वेबसाईटच्या मते 1987 मध्ये त्यांनी इंदौरच्या भक्तराज महाराजांकडून गुरुमंत्र घेतला. 1990 मध्ये त्यांनी सनातन भारतीय संस्कृती संस्थावास नावाची संस्था सुरु केली. मार्च 1999 मध्ये जयंत आठवलेंनी संस्थेचं नामकरण सनातन संस्था असं केलं.
महर्षी व्यासांचा अवतार, दुसरे विवेकानंद विष्णूचा अवतार ते नखावर ओम
सनातनच्या वेबसाईटनुसार जयंत आठवले महर्षी व्यासांचे अवतार आहेत आणि ते स्वत:ला दुसरे विवेकानंद मानतात.
इथवर सगळं ठीक आहे, पण सनातनच्या वेबसाईटवर नजर टाकली तर जयंत आठवलेंचे विष्णूच्या रुपातले फोटो आढळतात. त्यांचे साधक जयंत आठवलेंचे केस दीर्घ अध्यात्मिक साधनेमुळे सोनेरी झाल्याचं सांगतात. इतकंच नाही तर त्यांच्या बोटांच्या नखावर ओम उमटल्याचंही बोलतात. मात्र त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
जयंत आठवलेंना कुणीही भेटू शकत नाही
सनातनचा मुख्य आश्रम गोव्याजवळच्या फोंड्यात आहे. तिथं बाहेरच्या लोकांना जाण्यास मनाई आहे. कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आत नेऊ दिल्या जात नाहीत. आणि विशेषत: जयंत आठवलेंना कुणीही भेटू शकत नाही.
सनातनवरील आरोप
सुरुवातीला सनातनकडे एक अध्यात्मिक संस्था म्हणूनच पाहिलं जायचं. पण 2007 मध्ये एटीएसनं तीन साधकांना अटक केली आणि सनातनचं खरं रुप समोर आलं.
यदाकदाचित नाटकाला विरोध करत 31 मे 2008 ला विष्णुदास भावे नाट्यगृहात स्फोट घडवण्यात आला. त्यापाठोपाठ पुन्हा 4 जून 2008 ला गडकरी रंगायतनमध्येही स्फोट घडवण्यात आला. 2009 मध्ये मडगावमध्येही स्फोट घडवण्यात आला, ज्यात एकाचा मृत्यू झाला होता.
अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर 2011 मध्ये राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारनं सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री होते. तर राज्यात आर.आर.पाटलांकडे गृहखात्याची धुरा होती.
धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या नावाखाली सनातन काय करतंय हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. पण राजकारण आडवं आलं की कारवाई संथ होते. आता सनातनवरुन एवढा राडा सुरु असताना स्वत:ला भगवंताचा अवतार मानणारे जयंत आठवले कुठे आहेत? ते का बोलत नाहीत? हे कुणीही सांगायला तयार नाही.
स्पेशल रिपोर्ट :