जालना : विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत मुसळधार पाऊस बरसत असला तरी मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात पावसाने ब्रेक मारल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने डोळे वटारल्याने संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. मात्र सध्या जुलैचा दुसरा आठवडाही कोरडा गेला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकरी अजूनच खचणार आहे.
यंदा मराठवाड्यात 49 लाख 11 हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. त्या तुलनेत 17 लाख 87 हजार हेक्टरवरची पेरणी उरकली आहे.
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात निम्मी पेरणी आटोपली असताना जालना, परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अजून प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत 30 टक्केही पेरणी (5 जुलैपर्यंत) आटोपली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात 41 टक्के, तर बीड जिल्ह्यात 35 टक्के पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. मराठवाड्यातला बळीराजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे.
मराठवाडा अजूनही कोरडाच, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 06:03 PM (IST)
मराठवाड्यात पावसाने ब्रेक मारल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने डोळे वटारल्याने संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -