पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागेल आणि 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यात निवडणुका होतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरीमध्ये आयोजित कार्यक्रमात बारामती जिंकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं आहे. येत्या विधानसभेला अजित पवारांना पराभूत करु असं म्हटलं तर तुम्हाला हसू येईल, पण बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही पाटील म्हणाले. पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर होते.
2019 मध्ये विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याचं माझं टार्गेट जरी असलं तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. तो आशावाद असू शकतो, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. मी जमिनीवर पाय असणारा राजकारणी आहे. त्यामुळे येत्या विधानसभेला मी अजित पवारांना पराभूत करू, असं आज मी म्हणालो तर तुम्ही जोरजोरात हसायला लागाल, असेही ते म्हणाले. माझं लक्ष 2024 ची लोकसभा आहे. 2024 च्या लोकसभेला ब्रँडेड कमळावरचा खासदार असावा हे टार्गेट आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल सांगलीतील कार्यक्रमात केलं होतं. आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले, मात्र ते थोडक्यात वाचले असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पवारांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उध्वस्त केलं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
विधानसभेच्या निवडणुका 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jun 2019 06:08 PM (IST)
पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -