नागपूर : एखाद्या विद्यापीठातला दीक्षांत समारंभ, तिथं मिळणारं सुवर्ण पदक आणि टाळ्यांच्या कडकडाटात होणारा गौरव... कॉलेज लाईफमधलं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न. पण नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी या प्रकारला आता मुकणार आहेत.
ज्या सुवर्णपदकांसाठी चढाओढ असायची, जे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायचं, तीच सुवर्णपदकं आता बंद होणार आहेत. 2019 पासून नागपूर विद्यापीठावर ही नामुष्की ओढावणार आहे, त्याचं कारण आहे सुवर्णपदकांसाठी मिळणाऱ्या दानातली आणि व्याजातली घट.
नागपुरातील प्रतिष्ठित संत तुकडोजी महाराज विद्यापीठ... 94 वर्षे जुनं... सुरुवातीच्या काळात सुवर्णपदकांसाठी विद्यापीठाला शंभर-दीडशे रुपयांचं दान मिळायचं. त्यावेळी सोन्याच्या भावानुसार दीडशे रुपयांत सुवर्ण पदकं घेणं शक्य होतं. मात्र आता सोन्याचे भावही वधारले आणि दानशूरांचे हातही आखडते झाले.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, तात्या टोपे, भगत सिंह, पंजाबराव देशमुख, श्रीकांत जिचकार यासारख्या दिग्गजांच्या नावानं तब्बल 400 सुवर्ण पदकांनी विद्यार्थ्यांना गौरवण्यात यायचं. मात्र पुढील वर्षापासून निम्म्याहून अधिक पदकांचं वाटप बंद होणार आहे.