कोल्हापूर: वादावादीनंतर कोल्हापूरसह पाच शहरात होऊ घातलेली हेल्मेटसक्ती तूर्तास थांबवण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीत शहरांतील हेल्मेटसक्ती तूर्तास रद्द करण्यात आली.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहाराअंतर्गत हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला सर्वपक्षीयांनी विरोध केला होता. त्याबाबत आज सर्वपक्षीयांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केली.
वाहनचालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून, हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरलं.
या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काय होता पूर्वीच निर्णय?
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून वाहनचाकाना हेल्मेट सक्ती कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
याची पूर्वतयारी म्हणून पोलीस प्रशासनाने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असली, तरी शहराअंतर्गत हेल्मेट सक्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला.
सध्या महामार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून 15 जुलै पासून जिल्ह्यासह शहरातही हेल्मेट सक्ती करण्यात येणार होतं..
विश्वास नांगरे पाटलांच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध
शहराअंतर्गत हेल्मेटसक्ती होत असल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. शहरात वाढणाऱ्या चोऱ्या, हत्या, मारामाऱ्या यासह मटका, दारु या अवैध व्यवसायाकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन, हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणत विरोध दर्शविला आहे. पोलिसांनी पार्किंग, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही शिवसेनेने केली होती.
संबंधित बातम्या
कोल्हापूरसह पाच जिल्ह्यात 15 जुलैपासून हेल्मेटसक्ती