पुणे: कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं भय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलं आहे. मात्र पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केला आहे.
निर्भयाचं स्मारक तयार करणं म्हणजे तिची अवहेलना करण्यासारखं आहे, असा दावा करत संभाजी ब्रिगेडने पुण्यात भय्यूजी महाराजांचा पुतळा जाळला. त्याचबरोबर आज कोपर्डीत होणारा स्मारक अनावरणाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक
पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीनं स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचं भूमिपूजन झालं आहे.
साधारणपणे 50 बाय 50 फूटाचं स्मारक बांधण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या मध्यभागी पितळी धातूचा पुतळा बसवण्यात येणार आहे. स्मारकाशेजारीच लिंबाचं झाडही असेल. अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे. पीडित कुटुंबीयांच्या शेतात हे स्मारक बांधण्यात येत आहे.
राज्यभरात कँडल मार्च
राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कँडल मार्च काढण्यात येणार आहेत. तसंच आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहेत.
कोपर्डीत चिमुकलीवर पाशवी बलात्कार
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.
नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्काराबाबत विधानसभेत माहिती देताना म्हणाले, “आरोपींना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. तसेच, या कारवाईसाठी विरोधकांनी सरकारला पाठिंबा देऊन, आपण एक आहोत, हा संदेश द्यावा.”
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण
कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई