मुंबई: संजय राऊत आणि राज ठाकरे यांनी चिंता करु नये, हिंदूंच्या सणाची काळजी या रामदास कदमला आहे, बाळासाहेबांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, कृपया आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवू नये, महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असं बोललोच नाही, असं रामदास कदम यांनी सांगितलं.

आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदूंच्या सणावर निर्बंध येणार नाही आणि हे पाप शिवसेना आणि मी करणार नाही.  त्यामुळे फटाकेबंदीबाबत असा निर्णय घेणार नाही, असंही रामदास कदम म्हणाले.

फटाकेबंदी करणार नाही, पण पण प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती मी करणार, असंही त्यांनी नमूद केलं.

दिल्लीत फटाकेबंदी झालीच नाही, व्यापारी भागात फक्त फटाके विक्री करू नका, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे ज्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, फक्त प्रसिद्धीसाठी बोलायचं नाही, असं म्हणत रामदास कदम यांनी संजय  राऊत आणि राज ठाकरेंना चिमटा काढला.

रामदास कदम काल काय म्हणाले होते?

रामदास कदम यांनी काल विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली होती. यावेळी मुख्यमंत्रीही उपस्थित होते. महाराष्ट्रातही प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, यासाठी प्रयत्न करु, असं रामदास कदम म्हणाले होते.



संबंधित बातम्या

फटाकेबंदीवरुन शिवसेनेतच जुंपली, संजय राऊतांचा फटाकेबंदीला विरोध