रायगड : मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेले जगप्रसिद्ध घारापुरी बेट गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे. बौद्धकालीन लेण्या असलेल्या या बेटावर सुमारे हजार लोकांची वस्ती आहे. मुंबईसारख्या झगमगत्या शहराजवळ हे बेट असूनही इथे विजेचा तुटवडा आहे.
एमटीडीसीमार्फत संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान सुमारे तीन तास वीजपुरवठा केला जातो. डिझेल जनरेटरच्या मदतीने ही वीज पुरविली जाते. येत्या काही दिवसात केबलमार्फत नवीन वीज पुरवठा करण्यात येणार आहे. परंतु, गेल्या पाच दिवसांपासून घारापुरी बेटावरील वीज पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे.
एमटीडीसीमार्फत पुरवण्यात येणाऱ्या विजेसाठी आवश्यक डिझेलचा पुरवठा हा ठेकेदाराचे पैसे थकीत राहिल्याने डिझेल पुरवठा बंद केला आहे. यामध्ये डिझेल पुरविणाऱ्या ठेकेदाराचे सुमारे 40 लाख रुपये हे एमटीडीसीकडे थकीत राहिल्याने वीज पुरवठा बंद केल्याने जगप्रसिद्ध घारापुरी बेट हे गेल्या पाच दिवसांपासून अंधारात आहे.
या बेटावर राहणाऱ्या गावकऱ्यांना संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान अवघे तीन तास मिळणारी वीजही खंडित झाली आहे. स्थानिक महिलांना घरगुती स्वयंपाक देखील रात्र होण्यापूर्वी तयार करावा लागतो. मेणबत्तीच्या प्रकाशातच विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो.
सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून तातडीने वीज पुरवठा सुरु करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.