मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी, SIT आणि CID चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.
विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. सुमारे सव्वा तास मुंडेंनी अजित पवारांशी चर्चा केली आणि बीडची स्थिती समोर ठेवली. त्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी भूमिका घेतली असल्याची माहिती आहे.
तीनही तपासांमध्ये दोषी आढळल्यास कारवाई?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याचा अहवाल येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे. या तीनही चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे हे दोषी सापडले तर त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे.
अंजली दमानिया यांची टीका
अजित पवारांनी मुंडेंबाबत घेतलेल्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता असं त्या म्हणाल्या. अजित पवारांवर ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला त्यावेळी नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. तपास कार्यावर दबाव नको म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली होती. मग आता धनंजय मुंडे यांच्याबाबतही तीच भूमिका का नको असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला.
विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचीही मुंडेवर टीका
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड हा मुंडेंचा उजवा हात समजला जातो. या हत्येच्या संबंधित खंडणी प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो अटकेत आहे. अशा वेळी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवलं जावं अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी केल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा :