जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी परभणीतील जनआक्रोश मोर्चातून मंत्री धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह व आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत परभणीत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चातील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी धनजंय मुंडेंना लक्ष्य केलं. आरोपींवर धनजंय मुंडेंचा (Dhanajay munde) वरदहस्त असून त्यांचे गुंड आता देशमुख कुटुंबीयांना धमकी देत आहेत. यापुढे अशा धमक्या दिल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानंतर, मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काही ठिकाणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, वाशिममध्ये धनंजय मुंडे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं. यासंदर्भात बोलताना जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं.
धनंजय मुंडे आणि त्याच्या ज्या टोळ्या पाळल्या आहेत, लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करण्यासाठी, गुंडागर्दी करायला त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा ही तत्परता का दाखवली नाही. ही तत्परता संतोष देशमुख यांचा खून झाला तेव्हा दाखवणं गरजेचे होतं. दोन दिवस त्या बिचार्याचा मृतदेह पडून होता, केजच्या हॉस्पिटलमध्ये आणि पूर्ण मसाजोग गाव रस्त्यावर बसून होतं. त्यावेळेस ही तत्परता दाखवायची ना, असे मनोज जरांगे यांनी म्हटलं.
आम्ही या धनंजय मुंडेला कधी बोललो का, परंतु त्याचे गुंड लोक संतोष देशमुख यांच्या भावाला सुद्धा दादागिरी करायला लागले, धमकी द्यायला लागले, अरेरावी करायला लागले. आम्ही त्याच्यावर बोलायचं नाही का? आमचे मुडदे पडू द्यायचे का?, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. मी जाती बद्दल बोललो का, गुंडाला बोलायचं नाही का अजिबात, ही कोणती पद्धत आहे. संतोष देशमुख यांच्या मंडळींनी आणि लेकरांनी कसं जगायचं. धनंजय देशमुख न्यायासाठी फिरतोय आणि आज त्याला जर धमक्या यायला लागल्या तर एवढा मोठा समाज असून माय बापाच्या भूमिकेनं समाज येणार नाही का, त्या लेकराला पाठिंबा द्यायचा नाही का?, असे अनेक सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.
गुंडाला पण बोलायचं नाही ही कोणती पद्धत आहे ही संघटित गुन्हेगारी आहे, यांनी टोळीचं नेटवर्क प्रचंड उभा केलंय. याचा नायनाट नाही का झाला पाहिजे, त्यांच्या जातीतल्या लोकांना वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे? याच्यात ओबीसी मराठ्यांचा संबंध काय, तुम्ही कचाकच लोक मारून टाकायला लागले. याच्यात मराठ्याचा, वंजाऱ्याचा, ओबीसींचा संबंध काय. तुमच्यावर वेळ आली की ओबीसी आणि वेळ गेली की फक्त तुमचेच, ही कुठली पद्धत आहे. खून होऊन आम्ही बोलायचं नाही मग तर अवघड झालं, असे म्हणत धनंजय मुंडेंवरील टीकेचा विरोध करणाऱ्यांना व रस्त्यावर उतरणाऱ्यांना जरागेंनी सवाल विचारले आहेत.
धनंजय मुंडेंवर पुन्हा हल्लाबोल
ओबीसी नेते म्हणतात आरक्षणाची लढाई राहिली नाही. पण, ही लढाई आरक्षणाचीच आहे, आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही.25 जानेवारी रोजी सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. हा धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करायला लागला राज्यात जाणून-बुजून. कारण, टोळ्या तो पाळतोय, गुंड, खंडणी वसुल करणारे पाळतो आणि नावं दुसऱ्याला ठेवायला लागला. जातीवादी दुसऱ्याला समजावायला लागला, आता आंदोलनच काय उभा करायला लागला. ओबीसी नेत्यांना फोन करून सांगतो माझ्यामागे उभा राहा म्हणून. पम, मी गरिबासाठी लढणार, मागे हटणार नाही, असे म्हणत जरांगे यांनी पु्न्हा एकदा मंत्री धनजंय मुंडेंवर हल्लाबोल केला.
वाशिममध्ये जरांगेंविरुद्ध मोर्चा
मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या वक्तव्यावरून वाशिममध्ये वंजारी आणि इतर ओबीसी समाज आक्रमक होत आहेत. जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वंजारी आणि ओबीसी समाज बांधवांच्यावतीने घोषणाबाजी करत जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी, वाशिम जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनोज जरांगे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हेही वाचा
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले