पिंपरी चिंचवड : जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते पिंपरी चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात बोलत होते. जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता, एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. सोबतच गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, तुमच्याकडे किती जात आहे याची मला कल्पना नाही. पण आमच्या पाच जिल्ह्यातून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय, जो जातीचं नाव काढेल त्यांना ठोकून काढेन.

जातीय वाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता एकता या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे. गरीब-श्रीमंत ही दुफळी संपायला हवी. कोणी छोट्या जातीचा, कोणी मोठया जातीचा असता कामा नये. एकात्मता, पूर्ण खंड असा समाज व्हायला हवं हीच संकल्पना आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

टिळक आणि आगरकरांचे विचार मांडताना स्वराज्य आणि सुराज्य महत्वाचं असल्याचं गडकरी म्हणाले. स्वराज्य तर मिळालं पण आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय. आपल्या देशाला आर्थिक दृष्ट्या जगातील महाशक्ती बनवायचं आहे. गरिबी, भूकमारी, बेरोजगारी संपवायची आहे. सोशीत आणि वंचितांचे जीवन बदलवून, सामर्थ्य राष्ट्र निर्माण करायचं आहे. अशी अपेक्षा ही गडकरींनी व्यक्त केली.

तिकीट न दिल्यास नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांचे ही गडकरींनी कान टोचले. कान टोचतानाचा एक प्रसंगही त्यांनी सांगितला. वंचित समाजातल्या एका महिलेला तीस हजार रुपये देऊन, निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले. सहसा तर मी स्थानिकांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटपाचे निर्णय घेत असतो, पण यावेळी मी तस केलं नाही. पण नंतर ती महिला निवडून येणार नसल्याचे मला अनेकांनी पटवून दिलं. मग मी त्या महिलेची माफी मागून, तुम्ही निवडून येणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. तेंव्हा त्या महिलेने मग निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट द्या, असं खुल्या मनाने सांगितले. बरं पर्स मधून अठरा हजार रुपये परत केले आणि उर्वरित खर्च झालेली रक्कम परत देईन असं ही अाश्वासित केलं. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही. पण हल्ली सुशिक्षित कार्यकर्ते मात्र लगेच नाराज होऊन, जाहीरपणे व्यक्त ही होतात. असं म्हणत नाराज होणाऱ्यांचे गडकरींनी कान टोचले.