मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट, नांदेडमध्ये आठ वर्षाच्या मुलाने हात गमावला
एबीपी माझा वेब टीम | 10 Feb 2019 08:12 PM (IST)
मोबाईलचा मोठा स्फोट झाला आणि प्रशांतच्या डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरशा तुटून पडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा तळहात छिन्नविछिन्न होऊन मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटात घुसून त्याला मोठी दुखापत झाली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये मोबाईलवर गेम खेळत असताना स्फोट झाल्याने एका लहानग्याला आपला हात गमवावा लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात हा प्रकार घडला आहे. प्रशांत जाधव (वय 8 वर्ष) असे या मुलाचे नाव आहे. मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्याने टीव्हीवरील मोबाईलची जाहिरात पाहून मोबाईलची ऑनलाईन मागणी केली होती. 1500 रुपयांना तीन मोबाईल आणि त्यावर एक घड्याळ मोफत अशी आय कॉल के 72 (I KALL k72) या कंपनीची जाहिरात पाहून श्रीपत जाधव यांनी मोबाईलची मागणी केली. त्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल गेल्या एक ते दीड महिन्यांपासून ते वापरत होते. त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत जाधव हा नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला होता. यावेळी अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला आणि प्रशांतच्या डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरशा तुटून पडली. हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा तळहात छिन्नविछिन्न होऊन मोबाईलचे तुकडे त्याच्या छातीत, पोटात घुसून त्याला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेने प्रशांतच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे बाऱ्हाळी परिसरात मोबाईल वापरासाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.