नागपूर : भाजप कार्यकर्त्यांचं चारित्र्य आणि वर्तन खरोखर अटलजींचे विचार आणि मिशनच्या जवळ जाणारं आहे का? असा प्रश्न केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारला. नागपुरात दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत गडकरींनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देतानाच पक्षाचे विद्यमान नेते आणि कार्यकर्त्यांचा क्लास घेतला.
पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फक्त स्वतःबद्दल विचार करुन छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडत आहेत. माझं नाव पत्रिकेत छापलं नाही, पातळ हार घालून माझे स्वागत केले, माझा योग्य सन्मान केला नाही, मला घ्यायला कार्यकर्ते का नाही आले, मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा टोला गडकरींनी लगावला.
भाजपमध्ये अनेक आमदार इतक्या संकुचित मनाचे आहे की ते अमुक कार्यकर्त्याला मंचावर बसवू नका, त्याला पक्षात घेऊ नका असे मुद्दे घेऊन वाद घालत बसतात. अशा छोट्या मनाने आपल्याला अटलजींच्या विचारांवर कसं चालता येईल? असा थेट सवाल गडकरींनी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना विचारला.
अटलजी जसे खरोखर होते, तसे आपण आहोत का याचा विचार करा अशा शब्दात गडकरींनी कार्यकर्त्यांना सुनावले. पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डात अटलजी होते. मात्र त्यांनी कधीच आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी पद किंवा उमेदवारी मागितली नाही. पक्षाचे अनेक निर्णय त्यांच्या इच्छेविरोधातही व्हायचे, त्यांनी कधीच त्याला विरोध केला नाही. ते त्यांच्या व्यवहारातूनही लोकशाहीचे उपासक होते, असं गडकरी म्हणाले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलजींमुळे भारत अण्वस्त्रसंपन्न देश होऊ शकल्याचं सांगितलं. अटलजींच्या आधीही भारतीय शास्त्रज्ञ देशाला अण्वस्त्र संपन्न बनवू शकत होते. मात्र तेव्हाचे पंतप्रधान शास्त्रज्ञांना परवानगी देत नव्हते. अटलजींनी एपीजे अब्दुल कलाम यांना पोखरण चाचण्या करण्याची परवानगी दिली. म्हणून देशाची ताकद वाढल्याचं फडणवीस म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन अटलजींसारखं आहे? गडकरींनी झापलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Aug 2018 10:48 AM (IST)
मला फक्त चहाच दिला-बिस्किट दिले नाही अशा मुद्द्यांवर पक्षात खडाजंगी होते, असा टोला नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्ते-नेत्यांना लगावला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -