नागपूर : मोठा व्यावसायिक असल्याचं सांगून विधवा, घटस्फोटित आणि एकट्या राहणाऱ्या श्रीमंत महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मॅट्रिमोनियल वेबसाईट्सच्या माध्यमातून आरोपी हा महिलांना लुबाडत असे.
कधी अजय अग्रवाल, कधी अजय कुंभारे तर कधी अजय चावडा... वेगवेगळी नावं धारण करुन या भामट्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आपण मोठा व्यावसायिक असल्याचं भासवून अजय विवाहोच्छुक महिलांना विविध ठिकाणी बोलवायचा. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, याचा अंदाज घ्यायचा.
महिला श्रीमंत असल्यास तिच्याशी लग्न करायचा. काहीच दिवसांनी महिलांची चल-अचल संपत्ती विकून हा भामटा त्यांना वाऱ्यावर सोडून पळ काढायचा.
आरोपीने 23 ऑगस्टला अशाच पद्धतीने वर्ध्यात राहणाऱ्या एका महिलेला नागपूरच्या बेसा परिसरात भेटायला बोलावलं. त्यानंतर डस्टर कारमध्ये तिच्यासोबत बळजबरीचा प्रयत्न केल्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे गाडीभोवती लोक जमा झाले.
पीडित महिला आपली तक्रार सांगत असताना आणखी एका महिलेने पुढे येऊन याच भामट्याने काही महिन्यांपूर्वी लग्नाचं सोंग घेऊन आपली आर्थिक फसवणूक केल्याचं सांगितले.
हा प्रकार बेलतरोडी पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला. पोलिसांनी अजय अग्रवाल असं नाव सांगणाऱ्या या भामट्याला अटक केली. पोलिसांच्या मते अजयने आजवर अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केली असून त्याला आणखी काही आरोपींनी मदत केली असावी, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.