जालना : देशात आजवर मी 6 लाख कोटीची काम केली, पण आजवर लक्ष्मीदर्शन घेतलं नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला. तसेच ठेकेदारानं रस्तेबांधणीचं काम नीट केलं नाही, तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय.


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले की, ''आजवर मी देशभरात इतकी काम केली. पण ठेकेदार कोण असतो? हे मला माहित नाही. आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही.'' तसेच शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांना उद्देशून गडकरी पुढे म्हणाले की, ''रस्त्याचं काम चांगलं होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशाराच गडकरींनी दिलाय.