Maharashtra Politics नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah ) हे आजपासून दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (State Legislative Assembly Election 2024) अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, भाजपच्या आढावा बैठकीसाठी आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपराजधानी नागपुरात (Nagpur) येत आहे. दुपारच्या सुमारास त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर अमित शहा लगेचच शहरातील सुरेश भट सभागृहात भाजपच्या विदर्भ आढावा बैठकीसाठी पोहोचतील. या बैठकीला नागपूरसह विदर्भातील सर्व 62 मतदारसंघातील प्रमुख पंधराशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहे.


अमित शाहांच्या उपस्थितीत बैठकीला नितीन गडकरींची अनुपस्थिती


असे असताना, नागपुरातील या आढावा बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) अनुपस्थितीत राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. नितीन गडकरी यांचे जम्मू-काश्मीर मधील निवडणूक प्रचाराचा नियोजित दौरा आहे. त्यामुळे स्थानिक भाजप खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते असूनही गडकरी या कार्यकर्ता संवाद बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र,नितीन गडकरींची अनुपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चेला उधाण आले असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात नितीन गडकरी यांना लांब तर ठेवले जात नाहीये ना? असा प्रश्नही यानिमित्याने उपस्थित केला जात आहे. शिवाय या बैठकीनंतर नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची किती धुरा हातात राहतील याबद्दल देखील प्रश्नचिन्ह कायम असल्याचे बोलले जात आहे. 


अमित शहा यांचा विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व 


गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपला अपेक्षेप्रमाणे कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी आणि नव्या दमाने काम करण्यासाठी अमित शहा यांचा विदर्भ दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भात भाजपचा ग्राफ सतत खाली येत आहे. 2014 मध्ये विधानसभेत 44 जागा तर 2019 मध्ये 29 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे आता 2024 मध्ये विदर्भातून भाजपच्या जागा वाढवण्यासाठी अमित शाह पक्षाच्या रणनीतीचा आढावा घेतील. अशी शक्यता आहे. या बैठकीत विधानसभा संयोजक, विधानसभा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार यांसह प्रमुख पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. सुमारे 1500 पदाधिकारी या बैठकीत असणार आहे. दरम्यान, नागपूर, पोलिसांनीही अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. सुरेश भट सभागृह तसेच विमानतळापासून भट सभागृह पर्यंतचा मार्ग या सर्वच ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


हे ही वाचा