अहमदनगर: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून खटल्याबाबत हायकोर्टात दाद मागू, असं राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी सांगितलं.

थूल यांनी मंगळवारी नितीन आगे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अमर साबळेसह विवध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दोघांनीही नितीनचे वडिल राजू, आई आणि बहिणीशी संवाद साधला.

निकालाचा कायदेशीर अभ्यास करुन उच्च न्यायालयात दाद मागू असं थूल यांनी सांगितलं. आगे कुटुंबाला न्याय देण्यात येईल. त्याचबरोबर संरक्षण, राहण्याची व्यवस्था, पेन्शन आणि शेती देण्यात येईल, असं अश्वासन थूल यांनी यावेळी दिलं.

याप्रकरणी कोणी हलगर्जीपणा केल्यास दोषींवर  कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

तर खासदार अमर साबळे यांनी आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं सांगत, सरकार आगे कुटुंबाच्या पाठिशी उभं असल्याचं आश्वासन दिलं.

नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता

राज्यात खळबळ उडालेल्या खर्ड्याच्या नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका केली. तर अल्पवयीन तिघांची यापूर्वीच सुटका झाली होती.  एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झालाय. या खटल्यात तब्बल 26 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र न्यायालयात 14 साक्षीदारांना फितूर जाहीर केलं होतं.

नितीन आगे हत्या प्रकरण

28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता.

या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते.

या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.

हत्याप्रकरणाची पुन्हा चौकशी करु - बडोले

नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करु, शिवाय तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात गरज पडल्यास विशेष सरकारी वकील पुरवू, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार : राजकुमार बडोले


नितीन आगेला न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्टात जाणार : आठवले

EXCLUSIVE : अहमदनगर : नितीन आगे हत्याप्रकरणातील आरोपींची मुक्तता, नितीनच्या आई-वडिलांशी खास बातचित