मुंबई: काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा मुलगा आमदार संतोष दानवेंवर गंभीर आरोप केला आहे. आमदार संतोष दानवेंच्या पीएने चालत्या रेल्वेत दोन शासकीय कर्मचारी महिलांचा विनयभंग केल्याचा दावा, आमदार नितेश राणेंनी केला आहे.

 

नितेश राणेंनी थेट विधानसभेतच हा मुद्दा उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 

नितेश राणेंचा आरोप

"31 जुलै रोजी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये इगतपुरीजवळ दोन महिलांचा विनयभंग झाला होता.या दोन्ही महिला शासकीय कर्मचारी आहेत. या महिलांचा विनयभंग सचिन जाधवने केला.  सचिन जाधव दारू प्यायला होता. सचिन जाधव हा आमदार संतोष रावसाहेब दानवे यांचा पीए आहे. याप्रकरणी महिलांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्यात आला", असा आरोप नितेश राणेंनी विधानसभेत केला.