Umesh Kolhe Murder Case : अमरावतीमधील (Amravati Murder Case) उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरणाप्रमाणे कर्जतमध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षा देण्यात येईल असं म्हटलं आहे. यावेळी नितेश राणे यांनी सांगितलं की, नुपूर शर्माचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमधील प्रतिक पवार या तरुणाला 04 ऑगस्ट रोजी मारहाण करण्यात आली. प्रतिक पवार तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. उदयपूर आणि अमरावतीतल हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला कठोर शिक्षा होईल.' भाजपाने कधीही नुपूर शर्माचं सर्मथन केलं नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
'उपमुख्यमंत्री प्रकरणावर लक्ष ठेवून'
यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटलं आहे की, 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देश चालतो. हे महा विकास आघाडीचे सरकार नाही. संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. तेथील स्थानिक पोलिस आधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर FIR दाखल करण्यात आला. मात्र काही जण अजून ही फरार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहीजे. संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे
अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे आहे. या प्रकरणात एनआयएने आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. मुसफिक अहमद आणि अब्दुल अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कस्टडी मध्ये पाठविण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. या दोन्ही आरोपींवर कोल्हे हत्याकांडामध्ये सामील इतर आरोपींची मदत करणे आणि हत्येनंतर 'बिर्याणी पार्टी'चा आयोजन केल्याचा गंभीर आरोप एनआयएमार्फत कोर्टात करण्यात आला आहे. यापूर्वी सदर प्रकरणात एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 9 आरोपींना उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.