पुणे : वर्धा लोकसभा मतदारसंघातून (Wardha Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी आज पुन्हा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. विशेष म्हणजे कराळे मास्तर सातव्यांदा शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी शरद पवारांसोबत लोकसभा निवडणूकबाबत (Lok Sabha Election) चर्चा केली आहे. तसेच, त्यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय उद्याच किंवा परवा होणार असल्याचे कराळे म्हणाले आहेत. 


शरद पवारांच्या भेटीला आलेल्या नितेश कराळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, “पवार साहेबांची आजची सातवी भेट आहे. आम्ही मतदारसंघात कसे काम करू असे विचारले. त्यांनी आम्हाला तुम्ही काम करा असे सांगितलं. 25 किंवा 26 तारखेला अंतिम निर्णय होईल. शरद पवारांसोबत लोकसभा संदर्भात चर्चा झाली असल्याचे कराळे म्हणाले. 


मी महाविकास आघाडीचं काम करतोय 


दरम्यान, काँग्रेस नेते अमर काळे यांच्याकडून देखील वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्यात येत आहे. यावर बोलतांना नितेश कराळे म्हणाले की, "अमर काळे तयारीला लागले, पण अजून अंतिम निर्णय झाला नाही. ते काँग्रेसचे नेते आहेत. पण, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला गेली आहे. अमर काळे यांची काय गॅरंटी?, माझा पक्ष प्रवेश अजून बाकी आहे. मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील असा शब्द दिला आहे. आधी पक्ष प्रवेश करणार आणि मग उमेदवारी घेणार. मी महाविकास आघाडीचं काम करतोय. राज्यातील कुठलाच आमदार, खासदार सरकार विरोधात बोलत नाहीत. मला कोणाची भीती नाही. मी डेटा विश्लेषण केल्याशिवाय बोलत नाही, असे कराळे म्हणाले. 


नितेश कराळेंच्या भेटीवर भेटी....


वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी नितेश कराळे इच्छुक आहे. यासाठी मागील काही दिवसांपासून ते सतत शरद पवार गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांची आतापर्यंत सातवेळा भेट घेतली. तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील त्यांनी अनेकदा भेट घेतली. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


शरद पवारांची भेट घेण्यासाठी गर्दी वाढली...


मागील काही दिवसांपासून शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महाविकास आघाडीत उमेदवारी मिळवण्यासाठी कोणी पवारांची भेट घेत आहे, तर कोणी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी भेट घेत आहे. त्यामुळे शरद पवारांची भेट घेण्यासाठी नेतेमंडळी गर्दी करत आहेत. 


धंगेकर शरद पवारांच्या भेटीला...


पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यावर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावेळी मोहन जोशी आणि इतर काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे पुणे लोकसभा उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा धंगेकर शरद पवार यांच्या भेटीला आले होते. तर, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार हे पुण्यात 6 सभा घेणार असल्याचे धंगेकर म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nitesh Karale : पवार साहेबांचा आशीर्वाद असल्यास लोकसभा लढवतो; कराळे मास्तरांनी वर्ध्यातून दंड थोपटले