Pune Nirmanala Sitaraman : बारामतीला (Baramati) भाजप संघटना मजबूत करायला मी बारामतीचा दौरा करत आहे. बारामतीला टार्गेट करायला मी बारामतीत जाणार नाही आहे, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवायला हवं,  भारतात सगळीकडे आम्ही लक्ष घातले आहे, फक्त बारामती नाही, असं वक्तव्य निर्मला सीतारमण ( Nirmanala Sitaraman ) यांनी केलं आहे.


ग्रामीण लोकांशी संवाद साधणार आहेत. बारामती, पुरंदर आणि शिरुर या भागातील लोकांसमोर त्या आपले विचार मांडणार आहेत. मात्र ग्रामीण भागातील जनतेला त्यांची भाषा सहजपणे समजेल, असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला होता. त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बारामतीतील जनतेला भाषा समजवण्याची गरज नाही. साऊथ सिनेमा आपल्याला समजतो. पश्चिम बंगाल आणि देशाच्या इतर काही भागातून नेते येतात त्याची भाषा समजते त्यामुळे बारामतीमध्ये माझी भाषा लोक समजतात त्यामुळं चिंता नाही, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे


भाजपमध्ये गेलं तर ईडीची चौकशी होत नाही. त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं होतं. त्याला निर्मला सीतारमण यांनी खोचक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचा आणि ईडीचा काहीही संबंध नाही. ईडी कारवाईमध्ये आम्ही लुडबुड करत नाही. ईडी अशी कुठेही पोहचत नाही. मनी लॉंडरिंग असेल किंवा काही संशय असेल तर अशा केसमध्ये ईडी येते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


भारतातील महागाईच्या मुद्यावरदेखील त्यांनी भाष्य केलं. महागाईबाबत लोकसभेत प्रत्येक वेळी उत्तर दिलं आहे. खाण्याचे तेल आयात होतं. अतिवृष्टीमुळे महागाई झाली. टोमॅटो जास्त होणे किंवा कमी होणे यामुळे महागाई झाली असेल. अमेरिका तुर्कीमध्ये पण महागाई वाढली आहे आणि भारताची परिस्थिती आपण बघतच आहोत, असंदेखील त्या म्हणाल्या.


मला संघटना मजबूत करायची आहे


माझ्या बारामती दौऱ्याने या मतदार संघात बदल होईल, असं भाजपचे स्थानिक नेते म्हणतात. मात्र हा बदल घडवण्यासाठी माझा हा दौरा नाही आहे. आम्ही बारामतीच नाही तर अनेत मतदारसंघात प्रयत्न करणार आहोत. मला संघटना मजबूत करायची आहे आणि मी त्यासाठी आली आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 


तीन वर्षांपुर्वी सत्तेत असलेले आता टीका करतात


महाराष्ट्रात तीन चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नानार प्रकल्प हे सगळं थांबवणारे आता बोलत आहेत. हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रासाठीच होते. मुंबईतील आरेदेखील यांनीच थांबवला होता. या सगळ्या प्रकल्पाचा गुजरातला कोणता फायदा होणार होता?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.