पंढरपूर : शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंना पोलिसांच्या निर्भया पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि अकलूज परिसरात 1200 पेक्षा जास्त तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे.
शाळकरी मुलींना तरुणांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंढरपूर आणि माळशिरस या दोन्ही तालुक्यात निर्भया पथकाकडून रोडरोमियोंना चाप बसवण्यास सुरुवात करण्यात आली. या निर्भया पथकाची दहशत रोडरोमियोंमध्ये पसरल्याचं चित्र आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अशा रोडरोमियोंवर कडक कारवाई केल्याने मुलींना कोणत्याही अडचणींशिवाय पेपर देता आले.
मुली आणि पालकांकडून माहिती घेत पोलिसांनी त्यांच्या विभागात रोडरोमियो आणि तरुणांकडून त्रास होणारी ठिकाणे निश्चित केली. त्या ठिकाणी निर्भया पथकामार्फत तरुणांचं शूटिंग काढून त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या रोडरोमियोंचे आई-वडील आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या मुलाचे प्रताप त्यांच्यासमोर आणले.
पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वात मोठं महाविद्यालय आहे. जवळपास 10 हजार मुलामुलींचा येथे राबता असतो. ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी बसने पंढरपुरात येतात. या मुलींची बस स्थानकावरच छेड काढली जाते. पोलिसांनी अशा सर्व जागा हेरून त्या त्या ठिकाणी निर्भया पथकाचा वावर ठेवला. रोमियोगिरी करणाऱ्या तरुणांना उचलून कारवाईस सुरूवात केली.
निर्भया पथकातील पुरुष कर्मचारी महाविद्यालय, कोचिंग क्लासेसच्या बाहेर थांबून रोडरोमियोंवर लक्ष ठेवतात. यावेळी टगेगिरी करताना कोणी रोमियो आढळला की लगेच त्याची उचलबांगडी करून त्याच्या पालकांना बोलावणं धाडलं जातं.
वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साहही वाढला आहे. निर्भया पथकाच्या तरुणांमध्ये तयार झालेल्या दहशतीमुळे छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे.