सिंधुदुर्ग : काँग्रेस नेते निलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी बाळासाहेब जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप निलेश राणेंनी केला आहे. तसेच गायक सोनू निगम यांच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला असल्याचा दावाही निलेश राणेंनी केला आहे.


शिवसेना खासदार विनायक राऊतांनी रत्नागिरीतील वाटद जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नारायण राणेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर देताना निलेश राणेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारण करताना आम्ही बाळासाहेबांबद्दल कधी काही बोललो नाही. मात्र माझ्या वडिलांवर भर सभेत गलिच्छ आरोप होत असतील तर मला बाळासाहेबांबद्दल सागावं लागेल असं म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेवर प्रहार केला.


आनंद दिघेंच्या हत्येचा कट कसा रचला गेला? बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी तसे प्रयत्नही केले. ठाकरे घराण्याचे आणि सोनू निगमचे काय नातं होतं? हे मला सांगायला लावू नका असा इशाराही निलेश राणेंनी दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर कोणाकोणाचे मृत्यू झाले. हे सगळं जाहीर सभेत सांगेन, तसं करायला भाग पाडू नका, असा इशारा निलेश राणेंनी दिला.


ठाकरे घराण्याबद्दल बोललो तर स्मारक सोडा ठाकरेंच्या अंगावर कपडे राहणार नाहीत. लोकच स्मारक होऊ देणार नाही, असं विधान निलेश राणे यांनी केलं. आम्हाला आमच्या मर्यादा माहिती होत्या, मात्र विनायक राउतांनी मर्यादा सोडून आरोप केल्याने मला बोलावं लागत आहे. नारायण राणेंचं बाळासाहेबांवरचं प्रेम आजही कमी झालेलं नाही, मात्र त्यांना ते कधी सांगता आलं नाही, असं सांगायलाही निलेश राणे विसरले नाहीत.


काय म्हणाले होते विनायक राऊत?


नारायण राणेंच्या दहा वर्षातील राजकारणात त्या नऊ जणांचे बळी नेमके कोणी घेतले. हिंमत असेल तर नारायण राणेंनी उत्तर द्या, असं आव्हान खासदार विनायक राऊत रत्नागिरीतल्या वाटद जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या मेळाव्यात दिलं होतं. आमची निष्ठा पैशावर नाही, आमची निष्ठा स्वार्थावर नाही. आम्हाला काही दिलं नाही तरी आमचं भगव्यावर असलेलं इमान, बाळासाहेबांवरअसलेलं इमान कुठेही विकायला ठेवलेलं नाही ते मनामध्ये जपून ठेवलेलं आहे, असंही विनायक राऊत म्हणाले.


पाहा काय म्हणाले निलेश राणे?