औरंगाबाद : ओरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या सभेवेळी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी गोंधळ, खुर्च्यांची फेकाफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार रौप्यमहोत्सव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले याठिकाणी आले होते.


मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त दरवर्षी याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमानिमित्त आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांच्या येथे सभा होतात. यावर्षी रामदास आठवलेंची आज विद्यापीठ गेट परिसरात सभा होती.


सभेदरम्यान व्यासपीठावर एका स्थानिक नेत्याने भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला. त्यामुळे उपस्थितांपैकी एक गट संतापला. त्यानंतर त्यांनी सभा उलथून टाकण्याचा प्रयत्न केला.


आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत खुर्च्यादेखील फेकल्या. काही वेळ तणावपूर्ण स्थिती विद्यापीठ गेट परिसरात निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला.


गेल्यावर्षीही रामदास आठवलेंच्या सभेत अशाच प्रकारचा गोंधळ झाला होता. मात्र गेल्यावर्षी भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर गोंधळ झाला होता.