मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश समितीच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. निलेश राणे यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पत्र लिहिून राजीनामा देत असल्याचं सांगितलं.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी थेट अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. "ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष पदाला मोठा मान असतो. पण दीड वर्ष रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष नाही. हे माहित असूनही या विषयात लक्ष घातलं नाही. हा विषय गांभीर्याने हाताळला नाही. त्यामुळे सरचिटणीस म्हणून तुमच्यासोबत काम करणं मला शक्य नाही, ते जमणारही नाही," असं निलेश राणे यांनी पत्रात लिहिलं आहे.
पक्षाकडे आम्ही कधी काही मागितलं नाही. तरीही तुम्ही निर्णय देत नसाल आणि तुमच्या पदाचा वापर फक्त तुमच्यासाठीच करत असाल तर भविष्यात काँग्रेसची अजून दयनीय परिस्थिती होईल, असा घणाघातही राणे यांनी केला.
निलेश राणे म्हणाले की, "प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची पद्धत ही सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी असली पाहिजे. अध्यक्षाचं काम पक्षाला उभं करण्याचं असतं, बळ देण्याचं असतं. आधीच फार उशिर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं अजून किती नुकसान करणार आहोत हे आता बघायचंय."
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीसपदाचा राजीनामा देत आहे. परंतु यापुढेही काँग्रेस पक्षाचं काम करतच राहणार असल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.