Nilesh Rane Infected with Influenza: सध्याच्या सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरस (Influenza Virus) अनेकांना आपल्या विळख्यात अडकवत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपच्या (BJP) एक नेत्यालाही इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि भाजप खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. निलेश राणे यांनी  यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. 


भाजप खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "10 तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये Influenza Virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (Lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही." 






H3N2 ची लक्षणं काय?



  • ताप येणं

  • त्वचा उबदार आणि ओलसर होणं

  • चेहरा लाल होणंं

  • डोळे पाणावणं

  • सर्दी, अंगदुखी, कफ नसलेला खोकला, डोकेदुखी होणं


लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणं


लहान मुलांना H3N2 इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास त्यांना तीव्र ताप, पोटदुखी, मळमळ, उलट्या, खोकला, सर्दी, कफ न निघणे किंवा न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागतात.


गर्भवती महिलांना 'ही' लक्षणं दिसल्यास सतर्क राहा


H3N2 विषाणू संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांमध्ये काहीशी वेगळी लक्षणे दिसतात. गर्भवती महिलांना तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असल्यास काळजी घ्यावी आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्राँकायटिस, खोकला आणि सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी H3N2 इन्फ्लूएंझाची ही लक्षणे गर्भवती महिलांमध्ये दिसून येतात


काय काळजी घ्यायची?


H3N2 इन्फ्लूएंझा हा व्हायरल फ्लू आहे. हे इन्फेक्शन हवेद्वारे किंवा स्पर्शाद्वारे पसरते. संक्रमित व्यक्तीच्या जवळपास उपस्थित असलेल्या किंवा संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याचा संसर्ग होऊ शकतो. H3N2 विषाणूवरील सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही पण सावधगिरी बाळगून तुम्ही याच्या संक्रमणापासून वाचू शकता. त्यासाठी हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझर वापरा, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकून ठेवा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि गेल्यास मास्क वापरा. संक्रमित व्यक्तीपासून दूर राहा, मिठाच्या पाण्याने गुळण्या करा आणि लक्षणे आढळल्यास वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.