निलेश राणे यांनी काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना जबर मारहाण केल्याचा आरो आहे.
काय आहे प्रकरण?
मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये गेल्या रविवारी निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांना चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं, तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.
स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.
संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा
दरम्यान, संदीप सावंत यांनीही काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले,” असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.
यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.
निलेश राणेंची प्रतिक्रिया
दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.
संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे
दरम्यान संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून, आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली. नारायण राणे यांनी 27 एप्रिलला ठाणे रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या संदीप सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.