नांदेड: नांदेड जिल्ह्यात तप्त उन्हाने कहर केला आहे. उन्हाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचल्याने, अंगाची लाहीलाही होत आहे. पण अशाही परिस्थितीत कर्त्यव्य बजावत असताना उष्माघाताने नांदेड पोलिस दलातील "किंग" शहीद झाला. 'किंग' या श्वानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत 12 गोळ्या झाडून किंगला मानवंदना देण्यात आली.


 

नांदेड पोलिस दलातील श्वान "किंग"..गुन्ह्याची उकल करण्यात तरबेज.  काल नांदेड जिल्ह्यातील मसलगा इथं दोन इसमांचे निर्घुण खून झाले. अज्ञात इसमांनी खून केल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिस दलातील "किंग" ला बोलावण्यात आले. किंग अशा कामात तरबेज होता. ४४ अंश तापमान असतानाही किंगने आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला. पण आर्धा किलोमीटर अंतर धावताच किंग अचानक कोसळला. त्याला उपचारासाठी त्याच्या विशेष गाडीतून नेण्यात येत होते. पण रस्त्यातच 'किंग"  उष्माघाताने शहीद झाला.

 

साडेपाच वर्ष वय असलेला किंग २२ फेब्रुवारी २०१० साली पोलिस सेवेत दाखल झाला होता. डॉबरमॅन जातीचे श्वान हे गुन्हे शोध पथकात वापरले जातात. एक श्वान प्रशिक्षित करण्यासाठी पोलिस दलाला किमान दीड वर्षांचा कालावधी लागतो. "किंग"ने आजवर खून,दरोडा,जबरी चोरी अशा अनेक गुन्ह्यांचा छडा लावला होता. किंग हा त्याच्या नावाप्रमाणेच त्याच्या कर्तव्यात  किंग होता आणि कर्तव्य बजावतानाच तो शहीद झाला.

 

नांदेड पोलिस दलानेही किंगच्या कामाची कदर करत, त्याच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार  केले.