Latest Ahmadnagar News in Marathi: अहमदनगर जिल्ह्यातील महिला ऊस तोडणी मजुरांच्या दुरावस्थेबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील एका महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला आहे. 11 जानेवारी रोजी प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. 


गर्भवती महिला ऊसतोड मजुरांच्या दूरावस्थावरुन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं आज महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. पुढील चार आठवड्यांत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मजुरी करणाऱ्या महिलांपैकी दहा टक्के गर्भवती आहेत, मात्र त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या लाभांबद्दल माहित नाही. कोणतीही प्रसूती रजा आणि बाल संगोपन सुविधा दिली जात नाहीत, सोबतच संबंधित विभागांकडून त्यांना आरोग्यदायी आहार देखील दिला जात नाही, असं निरीक्षण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं नोंदवलं आहे. 


स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असताना अजूनही समाजातील एक मोठा घटक काही मुलभूत हक्कांपासून कोसो मैल दूर आहे. हीच आपल्यासाठी खेदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया काही समाजसेवकांनी दिली आहे. मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला विचारलेल्या प्रश्नांमध्ये तथ्य आढळल्यास, गरीब महिला मजुरांच्या मानवी हक्क उल्लंघनाचे गंभीर मुद्दे उपस्थित होत आहेत. 


11 जानेवारी 2023 रोजी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे. त्यानुसार, श्रीगोंदाच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे की, त्यांच्याकडे चालू हंगामात बाळांना जन्म देणाऱ्या सुमारे 35 ऊसतोड महिला मजुरांची नोंद आहे. श्रीगोंदा तहसील अंतर्गत येणाऱ्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांची आकडेवारी दिली आहे. 


दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये चार साखर कारखाने आहेत ज्यात साईकृपा फेज वन हा देवदैठण या ठिकाणी आहे...साईकृपा फेज टू हा हिरडगाव या ठिकाणी आहे, मात्र हिरडगाव कारखाना हा अनेक दिवसांपासून बंद आहे... तिसरा सहकारी साखर कारखाना हा सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना आहे. तर चौथा कारखाना कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना हा पिंपळगाव पिसा या ठिकाणी आहे... या चारही साखर कारखान्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील चाळीसगाव, बीड जिल्ह्यातील आष्टी आणि बीड शहरातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने येत असतात... श्रीगोंदा तालुक्याल्या लागून असलेल्या कर्जत - जामखेड मध्ये अंबालिका शुगर फॅक्टरी फेज वन आणि फेज टू हे साखर कारखाने आहेत.. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने हे याच तालुक्यात आहेत. साईकृपा फेज वन देवदैठण हा साखर कारखाना माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे पाहतात... सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना राजेंद्र नागवडे हे पाहतात...कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखाना याचे काम माजी आमदार राहुल जगताप हे पाहतात.