मुंबई : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार, असा विश्वास भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री, खासदार आणि आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीवेळी पांडे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचा सल्ला भाजप नेत्यांना दिला.

सरोज पांडे भाजप नेत्यांना म्हणाल्या की, आपली शिवसेनेसोबत युती आहे, तरीदेखील राज्यातील 288 मतदार संघामध्ये बुधची बांधणी करा. सर्व जागा निवडून आल्याच पाहिजेत.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्यात भाजप मोठा भाऊ आहे. त्यामुळे सर्वांच्या भावना आहेत की, भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा. लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी शिवसेना कमजोर होती ती जागा निवडून येण्यासाठी आम्ही प्रयन्त केले होते. आम्ही आता 288 जागांवर बूथ बांधणी करत आहोत, पक्ष मजबूत करतोय, त्या बळावरच निवडणुका जिंकत आहोत.

गिरीश महाजन यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. महाजन म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या मिळून 50 जागा येणार नाहीत.