सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या तांबेवाडीमध्ये बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटल्यानंतर, त्याला पुष्टी देणारा आणखी एक व्हिडीओ ‘माझा’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहेत.


काल बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर, जेमतेम तासाभरातच इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत ही प्रश्नपत्रिका आढळून आली.

विशेष म्हणजे, यानंतर पेपरफुटी प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती काल समोर येत होती. दशरथ सोनावणे या तरुणाला शिक्षकांनी भररस्त्यात दमबाजी केली. एका राजकीय पक्षाचा झेंडा असलेल्या गाडीतून त्याचं अपहरण केल्याचं सांगितलं जात होतं.

पण दुसरीकडे ही घटना उघड झाल्यानंतरही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली. आश्रमशाळेत पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी केला. विशेष म्हणजे, तसा अहवालदेखील कांबळे यांनी सादर केला.

पण आज या घटनेला पुष्टी देणारा आणखी एक व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. या व्हिडीओत पोलीस समोर असताना थेट दुसऱ्या मजल्यावर जाऊन विद्यार्थी खिडक्यातून कॉपी टाकताना दिसत आहे.

त्यामुळे पेपरफुटीप्रकरणी शिक्षण विभागाच्या भूमिकेमुळे विनोद तावडेंच्या शिक्षण विभागाला परीक्षेतले गैरप्रकार खरंच रोखायचे आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


संबंधित बातम्या

बारावीचा पेपर फुटला, तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर