पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसंबंधित आरोप केले जातात. यासंदर्भात पुण्यातील ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. किंबहुना, हे आरोप केव्हापासून सुरु झाले, हेही पवारांनी सविस्तरपणे सांगतिले.


या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. राज्यासह राष्ट्रीय स्तरावरील मुद्दे यांसह वैयक्तिक आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न केला.

“आपल्यावर विविध आरोप होतात. त्यावर तुम्ही कधीच स्पष्टीकरण देत नाहीत. म्हणून लोकांच्या मनात ते आरोप घट्ट होत जातात, असे का?” या राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी दाऊदच्या आरोपासंदर्भातील विषयही काढला आणि त्यावर पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरुन स्पष्टीकरण दिले.

पवार म्हणाले, “माझ्यावर आरोप केला गेला. दाऊद इब्राहिमची आणि माझी दोस्ती आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये. किंवा कुठे आहे ते माहित नाही. आम्ही लोकांनी त्याची असतील नसतील ती पाळंमुळं शोधून काढली, उद्ध्वस्त केली. कशाचा काही संबंध नाही. हा प्रश्न कसा आला, त्याच्या खोलात मी गेलो. त्याचा भाऊ कुठेतरी होता दुबईमध्ये. नवभारत टाईम्स की कुठल्यातरी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी त्याच्या भावाला भेटला. त्याच्याविरुद्ध काही वॉरंट नव्हतं.  हे कुठलं, कोकणातलं. रत्नागिरी जिल्ह्यातलं आणि मुंबईत वाढलेलं. दाऊदचा वडील पोलिस कॉन्स्टेबल होता. मुंबई पोलिसांमध्ये. पत्रकाराने दाऊदच्या भावाला बरेच प्रश्न विचारले. त्याला विचारलं, ‘तुम्ही मुंबईला का येत नाहीत?’ त्याने सांगितले, ‘तिथले सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हाला तिथे अटक केल्याशिवाय राहणार नाही. आमची यायची इच्छा आहे. आमचा जीव अस्वस्थ आहे. मुंबईशिवाय आम्हाला चैन पडत नाही. पण आम्हाला जाता येत नाही.‘ त्याने प्रश्न विचारला, मुंबईत कोण आहेत वगैरे. त्याने दिलीपकुमार माहित आहेत का, आणखी तीन-चार नटांची नावं घेतली. दाऊदचा भाऊ म्हणाला, ‘हो, आमचे आवडते नट आहेत.’ त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. त्याने विचारलं, मुख्यमंत्री शरद पवार माहित आहेत का? दाऊदचा भाऊ म्हणाला, ‘उनको कौन नहीं जानता? वो तो हमारे चिफ मिनिस्टर है..सब हम जानते है...”

पवार पुढे म्हणाले, “दुसऱ्या दिवशी बातमी आली की, "दाऊदचा भाऊ म्हणतो, शरद पवारांना आम्ही जाणतो." आणि नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आमचे परममित्र राम नाईकांनी प्रश्न विचारला, "दाऊदचा भाऊ म्हणतो, यांना ओळखतो, मग यांची चौकशी करणार का?" झालं.. सगळीकडे दाऊद.. दाऊद.. दाऊद.. झालं.”

दरम्यान, या मुलाखतीत शरद पवारांनी विविध विषयांवर सडेतोड भाष्य केले. राज ठाकरेंच्या अनेक प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. मात्र दाऊद इब्राहिमसंबंधातील आरोपाला जाहीर व्यासपीठावरुन पवारांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण देत, सविस्तर घटनाक्रम सांगितला.

महामुलाखत : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना शरद पवार यांची सडेतोड उत्तरं