पुणे : पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी पवारांनी राज यांच्या रोखठोक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. या महामुलाखतीच्या शेवटी राज यांनी शरद पवारांना ‘रॅपीड फायर’ प्रश्न विचारुन पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनीही राज यांच्या प्रश्नवर तितकीच भारी उत्तर दिली.


राज ठाकरे : यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी?

शरद पवार : या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की, इंदिरा गांधींच्या काही गोष्टीं ज्या मी पाहिल्या. एक लहानशी गोष्ट सांगतो, इंदिरा गांधी रशियाला गेल्या. त्यावेळी सेव्हिएत रशिया होतं. आणि सेव्हिएत रशिया आणि भारताचं अत्यंत घनिष्ट संबंध होते. इंदिरा गांधी मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्या. आणि प्रोटोकॉल असा आहे की, कुठल्या देशाचा पंतप्रधान आल्यास पंतप्रधान किंवा त्या दर्जाच्या पदावरील माणसाने त्यांचं स्वागत करायंच असतं. इंदिरा गांधींच्या स्वागताला त्या दर्जाची व्यक्ती रशियन सरकारने पाठवली नाही. आपले अॅम्बेसिडर होते इंद्रकुमार गुजराल. नंतर ते पंतप्रधानही झाले. गुजराल यांनीही त्यांचं स्वागत केलं. रशियन अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. इंदिरा गांधींनी गुजरालांना सांगितले, "क्रॅमलीनला गाडी न्यायची नाही. अॅम्बेसिडरच्या घरी जायचं." अॅम्बेसिडरच्या घरी गाडी गेली. शनिवार असल्याने अॅम्बेसीमध्ये सुट्टी होती. तिथे भारतीय कर्मचारी राहत होते. तिथल्या लहान मुलांना एकत्र करुन इंदिरा गांधी त्यांच्यासोबत खेळू लागल्या. लंगडी, गोट्या हे खेळ इंदिरा गांधी मुलांसोबत खेळत होत्या. आणि क्रॅमलीनला रशियन पंतप्रधान त्यांची वाट पाहत होते. इंदिरा गांधी क्रॅमलीनला आल्या नाहीत म्हणून मग रशियन पंतप्रधान इंडियन अॅम्बेसीमध्ये घ्यायला आले. त्यांच्या लक्षात आले की आपली चूक झाली आणि दिलगिरी व्यक्त केली.  इंदिरा गांधी म्हणाले, "हा व्यक्तिगत अपमान नाही. 100 कोटी जनतेचा अपमान आहे. त्यांची प्रतिष्ठा जपणे माझी जबाबदारी आहे." असं एक वेगळं धाडसी व्यक्तिमत्त्व इंदिरा गांधी यांचं होतं. यशवंतराव हे स्वभाव, वाचन, लेखन, सुसंस्कृत भूमिका हा सगळा एक वेगळा दृष्टीकोन होता. त्यामुळे दोघांच्या भूमिकेत फरक होता. दोघांचेही योगदान आहे. एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आणि एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाण, योगदान, देशात आणि महाराष्ट्रात मोठं होतं.

राज ठाकरे शेतकरी की उद्योगपती

शरद पवार शेतकरी

राज ठाकरे मराठी उद्योगपती की अमराठी उद्योगपती?

शरद पवार उद्योगपती

राज ठाकरे महाराष्ट्र की दिल्ली?

शरद पवार दिल्ली, महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात पाहिजे.

राज ठाकरे उद्धव ठाकरे की राज ठाकरे ?

शरद पवार ठाकरे कुटुंबीय

रॅपिड फायर प्रश्न : राज ठाकरेंच्या ‘रॅपिड’ प्रश्नांवर शरद पवारांची ‘फायरिंग’