मुंबई : सामान्य नागरिकांच्या खिशाला उद्यापासून आणखी कात्री लागणार आहे. कल्याणकारी दूध संघाने गायी-म्हशीच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या किमतीबाबत राज्यातील कल्याणकारी दूध संघांची काल पुण्यात बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


दूध दरवाढीच्या घोषणेनंतर गायीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 46 रुपयांवरुन 48 झाली आहे. तर म्हशीच्या दुधाची किंमत 56 ऐवजी 58 रुपये झाली आहे. हिवाळ्यात दुधाच्या उत्पादनात दरवर्षी 20 ते 22 टक्के वाढ होते. यावर्षी उशीरापर्यंतच्या पावसामुळे देखील दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे 10 टक्के दूध उत्पादन घटलं आहे. अशा सर्व कारणामुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. त्यामुळे दूध विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याबाबत संघाच्या सदस्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायी, म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर प्रत्येकी दोन रुपयांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचं राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितलं.


काही दिवसांपूर्वीच पॅकिंग दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. अमूल आणि मदर डेअरीच्या दुधातही वाढ करण्यात आली होती. मदरडेअरीने दुधाची किंमत तीन रुपयांनी तर अमूलने दोन रुपयांनी वाढवली होती. टोंड दूध तीन रुपयांनी वाढल्याने 42 रुपयांना मिळणारं टोंड दूध 45 रुपयांना झालं होतं. तर फुल क्रीम दूध 53 रुपयांवरून वाढून 55 रुपये झालं होतं. अमूलने किंमत दोन रुपयांनी वाढवल्याने अमूल गोल्ड एक लीटर दुधाची किंमत 56 रुपये झाली होती.