मुंबई : शिक्षकांच्या बदल्यांचे नवे धोरण आज जाहीर करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ शिक्षकांच्या बदल्या ॲाफलाईन करण्यास इच्छुक होते. मात्र त्यामुळे राज्यात शिक्षकांच्या बदल्यात पूर्वी होत होता तसा पैशांच्या खेळ होईल, असा शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. राज्यभर या संदर्भात बैठका झाल्या. त्या बैठकांनाही संघटनांनी सहभाग नोंदवताना ॲानलाईनचीच मागणी केली होती. ती आज मान्य करण्यात आली. पूर्वीच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात बदल्या ॲानलाईन सूरू झाल्या होत्या.


महाविकास आघाडी सरकारने शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमला होता. या अभ्यासगटाचा अहवाल पाहून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते. 


बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरायची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झाली आहे. आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तसेच अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यास सर्वसाधारण अशी दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना शाळेतील पाच वर्षे वयाची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्यास सेवाजेष्ठता विचार करून सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल. 


शिक्षक बदली कार्यपद्धती


बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारता घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी आणि शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्य दिले जाईल. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.  या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.