मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहे. कामगारांनी स्थलांतर करु नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी कामगारांना केले आहे. तसेच राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारीत असलेल्या सर्व कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निसंदेह रहावे.
राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली. राज्यातील मजूर व कामगारांच्या सध्याच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.