पंढरपूर : आषाढीच्या तोंडावर अखेर मंदिर समितीने मुखदर्शनासाठी खास उंच प्लॅटफॉर्म तयार करुन घेतला आहे. भाविकांसाठी केलेल्या नव्या व्यवस्थेमुळे आता सर्वच भाविकांना देवाचा चेहरा दिसू लागल्याने भाविक सुखावला. यामुळे आता मुखदर्शन रांगेतील भक्तांची गर्दीही आता वाढू लागली आहे.
गर्दीच्यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी 20-20 तास दर्शनरांगेत उभं राहणं ज्या भाविकांना शक्य नसतं. असे भाविक विठुरायाच्या मुखदर्शनासाठी गर्दी करतात. मात्र पूर्वी केलेल्या व्यवस्थेमध्ये देवाचा चेहराही भाविकांना दिसू शकत नव्हता. विठुरायाचा गाभारा लहान व कमी उंचीचा असल्याने मुखदर्शन करताना कमी उंचीच्या माणसाला गाभाऱ्यातील देव दुरून दिसत नसे. याची तक्रार वारंवार भाविकांकडून होऊ लागल्यानंतर मंदिर समितीने खास उंच प्लॅटफॉर्म बनवला आहे.
सिंहगड इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी मुखदर्शनासाठी नवीन पायऱ्यांचा लाकडी प्लॅटफॉर्म डिझाईन करुन बसविल्याने आता मुखदर्शनासाठी येणार भाविक या पायऱ्यांवर चढून देवाचे नीट दर्शन होणार आहे. बहुतांश कमी उंचीच्या महिलांनाही आता देवाचे स्पष्ट दर्शन होऊ लागल्याने मुखदर्शनाची गर्दीही आता वाढू लागली आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वी तीन दिवस ही नवी व्यवस्था कार्यान्वित केल्याने हजारो भाविक आता मुखदर्शनाचा लाभ घेताना दिसू लागले आहेत.